19 January 2026

जया एकादशी: मनशुद्धी, कर्म आणि दानाचे महत्त्व

Start Chat

हिंदू धर्मात एकादशीला अनन्य साधारण महत्व असते आणि माघ शुक्ल पक्षातील एकादशी, जी जया एकादशी म्हणून ओळखली जाते, ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विजय आणि यश प्रदान करणारी मानली जाते. शास्रात तिचे असे वर्णन केले आहे कि जया एकादशी हि भगवान विष्णूंच्या पूजन व व्रतासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. जया एकादशीचे व्रत केल्याने पापांचे निर्मूलन होते, मन व कर्म शुद्ध होतात आणि भक्ताला मोक्षमार्गाची प्रेरणा मिळते, जया एकादशीचा उपवास हा खूप पुण्यदायी मानला जातो तसेच अशी पण मान्यता आहे की या पवित्र तिथीला विधीपूर्वक व्रत केल्यास श्रीहरि प्रसन्न होतात, साधकाच्या जीवनातील दोष दूर होतात आणि त्याला अनंत सुखाची प्राप्ती होते.


जया एकादशी तिथी व शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार जया एकादशी २९ जानेवारी रोजी आहे आणि एकादशीचे व्रत ह्याच दिवशी केले जाईल. जया एकादशीची तिथी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांपासून सुरू होईल आणि ही तिथी २९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असेल.  विष्णू पूजनाचा आणि उपवास सोडून अन्नग्रहण करण्याचा मुहूर्त खालीलप्रमाणे

भगवान विष्णू पूजा मुहूर्त

२९ जानेवारी  पहिला शुभ मुहूर्त: सकाळी ७:११ ते ८:३२

२९ जानेवारी दुसरा शुभ मुहूर्त: दुपारी ११:१४ ते १:५५


उपवास सोडण्याचा मुहूर्त

३० जानेवारी रोजी सकाळी ६ वाजून ४१ मिनिटांपासून ८ वाजून ५६ मिनिटांदरम्यान जया एकादशीचा उपवास सोडून अन्नग्रहण करता येईल.

 

पौराणिक संदर्भ

पद्मपुराणानुसार, एकदा धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना असा प्रश्न विचारला कि अशी कोणती एकादशी आहे, जी अत्यंत कठीण पापांचाही नाश करते आणि भक्ताला मोक्षमार्गावर नेते. तेव्हा श्रीकृष्णांनी माघ शुक्ल पक्षातील जया (अजया) एकादशीचे माहात्म्य सांगितले.

पुराणकथांमध्ये उल्लेख आहे की इंद्रलोकातील काही गंधर्वांनी केलेल्या अनुचित वर्तनामुळे त्यांना पिशाच्च योनीत जन्म घ्यावा लागला. दुःख, पश्चात्ताप आणि निराशेने ग्रासलेल्या त्या गंधर्वांनी मग जया एकादशीचे व्रत निष्ठेने केले. भगवान विष्णूंच्या कृपेने या व्रताच्या प्रभावातून त्यांची पिशाच्च योनीतून मुक्तता झाली आणि त्यांना पुन्हा दिव्य लोकात स्थान प्राप्त झाले.

म्हणूनच जया एकादशी ही बंधनातून मुक्त करणारी, पापहरण करणारी आणि आत्मोद्धाराची एकादशी म्हणून ओळखली जाते. भगवान विष्णूची उपासना, संयमित आचार आणि दानधर्म यांच्या माध्यमातून जीवन शुद्ध करण्याचा संदेश ही एकादशी देते.

 

व्रत कसे करावे?

१. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि श्री विष्णूंच्या पूजेचा संकल्प करावा.

२. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा.

३. विष्णू सहस्त्रनाम किंवा जया एकादशीची कथा वाचावी.

४. दिवसभर शक्यतो फलाहार करावा आणि तांदूळ (भात) खाणे टाळावे.

५. दुसऱ्या दिवशी (द्वादशीला) सात्विक भोजन करून उपवास सोडावा.


उपवास आणि ‘मनशुद्धी’

उपवास म्हणजे केवळ अन्न त्यागणे असे नाही, जया एकादशीचा खरा संदेश ‘मनशुद्धी’ हा आहे. मनशुद्धी म्हणजे मनातील काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर यांसारख्या विकारांना बाहेर काढणे.

  • विचारांची स्वच्छता: ज्याप्रमाणे आपण शरीर स्वच्छ ठेवतो, तसेच मनातील काम, क्रोध, लोभ आणि मत्सर यांसारख्या विकारांना बाहेर काढणे म्हणजे खरी मनशुद्धी.
  • सात्विकता: या दिवशी सात्विक आहार आणि ईश्वराचे नामस्मरण केल्याने मनातील चंचलता कमी होते आणि एक प्रकारची आंतरिक शांती लाभते.
  • मौन आणि ध्यान: थोडा वेळ मौन पाळल्याने आपल्याला स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो, जो मन शुद्ध करण्यास मदत करतो.


दानाचे महत्त्व

अध्यात्म सांगते की, ‘दानेन धनं शुद्धयति’ म्हणजेच दानाने धनाचा शुद्धीकरणाचा मार्ग मोकळा होतो. जया एकादशीला केलेल्या दानाला विशेष महत्त्व आहे.

  •       अन्नदान: गरजूंना अन्न देणे हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. त्यामुळे ह्या दिवशी अन्नदान करणे फलदायी ठरते.
  •       नि:स्वार्थ भावना: जया एकादशीला दान करताना ‘मी कोणावर उपकार करत आहे’ हि भावना बाजूला ठेवून ‘ही ईश्वराची सेवा आहे’ ही भावना ठेवणे म्हणजे खरे दान.
  •       द्वादशीच्या दानाचे  महत्त्व: एकादशीचा उपवास सोडताना ब्राह्मणांना किंवा गरजूंना दान-दक्षिणा दिल्याने व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते.

जया एकादशी आपल्याला केवळ एका दिवसाचा उपवास शिकवत नाही, तर ती आपल्याला ‘जीवन जगण्याची कला’ शिकवते. ‘जया’ म्हणजे विजय, आणि खरा विजय तोच असतो जो आपण स्वतःच्या मनावर संयम ठेवून मिळवतो.

जेव्हा आपण श्रद्धेने उपवास करतो, तेव्हा आपले शरीर शुद्ध होते; जेव्हा आपण नामस्मरण करतो, तेव्हा आपले मन शुद्ध होते; आणि जेव्हा आपण गरजूला दान करतो, तेव्हा आपले कर्म शुद्ध होते. या त्रिवेणी संगमातूनच खऱ्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो.

त्यामुळे, या जया एकादशीला आपण संकल्प करूया की केवळ अन्नाचा त्याग न करता, मनातील रागाचा आणि द्वेषाचाही त्याग करू. आपल्या कर्मात पारदर्शकता आणू आणि हाताने शक्य होईल तेवढी मदत इतरांना करू. हाच जया एकादशीचा खरा संदेश आणि हाच परमेश्वराचा खरा आशीर्वाद आहे.

गरजूंच्या भुकेची तृप्ती हीच खरी ईश्वर भक्ती हे जाणून नारायण सेवा संस्थानाने मागील ४ दशकांत करोडो गरजवंतांना अन्नदान केले. मुख्य म्हणजे नारायण सेवा संस्थाना मध्ये उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला निशुल्क पौष्टिक अन्न देण्यात येते ज्यामुळे तो कमी अवधीत तंदरुस्त होण्यास मदत होते. रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाइकांना सुद्धा निशुल्क अन्न पुरविले जाते. आपण सुद्धा ह्या उपक्रमात छोटीशी मदत देऊन सहभागी होऊ शकता. आपल्या मदतीमुळे एका रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकाला दिवसभराचे अन्न मिळू शकते. ह्यामधून आपल्याला ईश्वरसेवेचे पुण्य लाभेल हे नक्की.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्रश्न: जया एकादशीचे महत्त्व काय आहे?
उत्तर: माघ शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणून ओळखले जाते. ही एकादशी भगवान श्री विष्णूंच्या पूजन व व्रतासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. या व्रतामुळे या जन्मात तसेच पूर्वजन्मात नकळत झालेल्या पापांचे उच्चाटन होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो, अशी धार्मिक मान्यता आहे.

प्रश्न: जया एकादशी कधी आहे?
उत्तर: हिंदू पंचांगानुसार जया एकादशी २९ जानेवारी रोजी आहे. एकादशी तिथी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४:३५ वाजता सुरू होईल आणि २९ जानेवारी रोजी दुपारी १:५५ वाजेपर्यंत राहील.

प्रश्न: जया एकादशीला श्री हरी विष्णूंची पूजा कधी करावी?
उत्तर: जया एकादशीच्या दिवशी श्री विष्णू पूजेसाठी दोन शुभ मुहूर्त दिले आहेत. पहिला मुहूर्त सकाळी ७:११ ते ८:३२ दरम्यान असून दुसरा मुहूर्त दुपारी ११:१४ ते १:५५ दरम्यान आहे.

प्रश्न: श्री हरी विष्णूंची पूजा कशा प्रकारे करावी?
उत्तर: सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि शुभ मुहूर्तानुसार भगवान विष्णूंसमोर हातात जल घेऊन व्रताचा संकल्प करावा. विष्णूंना फळे, फुले, पंचामृत आणि तुळशीची पाने अर्पण करावीत. “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा. दिवसभर एकादशी कथा व विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा.

प्रश्न: जया एकादशीचा उपवास कधी आणि कसा सोडावा?
उत्तर: जया एकादशीच्या पुढील दिवशी द्वादशी असते. त्या दिवशी सूर्यदयानंतर उपवास फलहाराने सोडावा. सात्विक भोजन करावे आणि भोजनापूर्वी ब्राह्मणांना दान-दक्षिणा किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. असे केल्याने व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होते.

X
Amount = INR