“निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू,
अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी…”
समर्थ रामदास स्वामींनी ज्यांचे वर्णन अशा शब्दांत केले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ज्यांनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी, स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य अर्थात जनतेचे राज्य निर्माण केले. म्हणूनच त्यांचा “रयतेचा राजा” म्हणूनही उल्लेख केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक तेजस्वी, राष्ट्रनिष्ठ आणि अतुलनीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे, तर ध्येय, नीती, बुद्धी, आणि जनतेच्या विश्वासाच्या आधारे स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून दरवर्षी १९ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरात ‘शिवजयंती’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २०२६ मध्ये आपण महाराजांची ३९६ वी जयंती साजरी करत आहोत.
शिवजयंती साजरी करण्याची परंपरा सर्वप्रथम महात्मा जोतिराव फुले यांनी १८७० मध्ये रायगडावर सुरू केली. पुढे लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना बहुजन समाजाचे, शेतकरी-कष्टकऱ्यांचे, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राजा म्हणून समाजासमोर मांडले तर टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी, राष्ट्रवाद जागवण्यासाठी, ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याची जाणीव निर्माण करण्यासाठी शिवजयंती साजरी केली.
यावर्षी शिवजयंती गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी होत आहे. तिथीनुसार ही जयंती ६ मार्च
२०२६ (फाल्गुन वद्य तृतीया) रोजी येते. शिवजयंती हा केवळ एक सण नसून प्रत्येक मराठी मनाचा स्वाभिमान आहे.
शिवाजी महाराजांवरील काही प्रसिद्ध पुस्तके किंवा ग्रंथ (मराठी व इंग्रजी) खालील प्रमाणे
१. शिवचरित्र – कृष्णाजी अनंत सभासद (सभासद बखर म्हणून हि ओळख)
२. छत्रपती शिवाजी – सेतुमाधवराव पगडी
३. राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे
४. शिवाजी महाराज – वा. सी. बेंद्रे
५. श्रीमान योगी – रणजित देसाई
१. Shivaji and His Times – Jadunath Sarkar
२. Life of Shivaji Maharaj – Kincaid & Parasnis
वरील पुस्तकांमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती आणि रणजित देसाई यांचे श्रीमान योगी हि सर्वात लोकप्रिय आणि लोकमान्यता मिळालेली पुस्तके आहेत.
१. रयतेच्या उपजीविकेचे रक्षण: महाराजांच्या सैन्याला नेहमी स्पष्ट आदेश असत की शेतकऱ्यांची शेती, जनावरे किंवा धान्य यांना कोणतीही हानी होता कामा नये. एकदा मोहिमेदरम्यान काही सैनिकांनी शेतकऱ्यांचे धान्य उचलल्याची माहिती महाराजांना मिळाली. त्यांनी त्वरित आदेश देऊन ते सर्व धान्य परत करून घेतले आणि शेतकऱ्यांना राजकोषातून भरपाई दिली. ही घटना महाराजांच्या सेवाभावी व न्यायप्रिय स्वभावाचे उत्तम उदाहरण आहे.
२. दुष्काळात करमाफी आणि अन्नदान: दुष्काळाच्या काळात महाराजांनी शेतकऱ्यांकडून कर वसुली थांबवली. राजकोषातील धान्य गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. त्या काळात अनेक राजे ऐषआरामात मग्न असताना, महाराज स्वतः प्रजेच्या दुःखाशी जोडले गेले. हे एकप्रकारचे दान होते पण अभिमान न बाळगता, कर्तव्य म्हणून केलेले.
३. शासनाची भाषा मराठी केली – शैक्षणिक क्रांती: शिवाजी महाराजांनी प्रशासनातील फारसी भाषेऐवजी मराठी व संस्कृत भाषांचा वापर सुरू केला. राजपत्रे, आदेश व नोंदी मराठीत लिहिल्या जाऊ लागल्या. त्यामुळे सामान्य जनतेला राज्यकारभार समजणे सोपे झाले तसेच मातृभाषेचा सन्मान आणि शिक्षणाला चालना मिळाली. हा केवळ भाषाबदल नव्हता, तर ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारा सुधारक निर्णय होता.
४. स्त्री सम्मान सर्वोच्च: महाराजांचे स्पष्ट आदेश असायचे कि मोहिमे दरम्यान स्त्रीयांवर तसेच लहान मुलांवर कोणताही अत्याचार होता कामा नये. एका मोहिमेत एका महिलेला कैद केले होते, महाराजांना काळातच त्यांनी त्या महिलेला साडी-चोळी, दागिने देऊन सुरक्षितपणे तिच्या कुटुंबाकडे रवाना केले. हि दया नव्हती तर नैतिक मूल्य जपणारी सेवा होती.
५. शहीद किंवा जखमी व अपंग झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांची जबाबदारी: युद्धात शहीद झालेल्या किंवा जखमी झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांची काळजी महाराजांनी स्वतः घेतली. त्यांच्या कुटुंबांना जमीन, आर्थिक मदतीची तरतूद करण्यात येत असे. ह्यातून महाराजांची आपल्या लोकांबद्दलची संवेदनशीलता दिसून येते. ह्या गोष्टींमुळेच स्वराज्य निर्माण करण्यासाठी, तानाजी मालुसुरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद आणि अश्या अनेकांनी प्राणाची आहुती दिली.
६. सर्व धर्मांप्रती समान आदर: महाराजांनी मंदिरे जशी जपली, तशीच मशिदी व दर्ग्यांचेही संरक्षण केले. धर्मस्थळांना हानी पोहोचवणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जात असे. त्यांचा विचार स्पष्ट होता, “धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच असते.” त्यांचा सर्वधर्मसमभाव ही एकप्रकारे सामाजिक सेवा होती. ह्यामुळेच महाराजांच्या सैन्यात आणि प्रशासनात अनेक निष्ठावान मुस्लिम अधिकारीही होते.
१. किल्ले दर्शन: आपल्या जवळच्या कोणत्याही किल्ल्याला भेट देऊन तिथली स्वच्छता राखावी
२. व्याख्यान आणि वाचन: महाराजांच्या इतिहासावर आधारित पुस्तके, त्यांची पत्रे वाचावी. शिवविचार सांगणाऱ्या प्रज्ञावंत व्यक्तींची व्याख्याने ऐकावी
३. मदत कार्य: अनाथाश्रमात अन्नदान किंवा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून सामाजिक पद्धतीने शिवजयंती साजरी करता येईल.
४. डिजिटली शिव-विचारांचा प्रचार: सोशल मीडियावर महाराजांचे प्रेरणादायी विचार, त्यांनी केलेली सामाजिक कार्ये जास्तीत जास्त शेअर करावी
शिवजयंती हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून, तो आपल्या कर्तव्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य तलवारीच्या बळावर नव्हे, तर सेवा, न्याय, शिक्षण आणि लोककल्याण या मूल्यांच्या आधारावर उभे होते. राज्य चालवणे म्हणजे सत्ता मिळवणे नाही तर जनतेच्या रक्षणासाठी तत्पर राहणे. स्वराज्य म्हणजे ‘स्वतःचे राज्य’ नव्हे, तर ‘रयतेचे राज्य’ हा विचार महाराजांनी पहिला मांडला. परकीय आक्रमकांच्या गुलामगिरीत अडकलेल्या समाजाला ‘आपणही मुक्त श्वास घेऊ शकतो’ ही जाणीव त्यांनी करून दिली.
महाराजांची सेवा ही फक्त दाखवण्यापुरती नव्हती; ती शेतकऱ्यांचे संरक्षण, स्त्री-सन्मान, दुष्काळात मदत, सैनिकांच्या कुटुंबांची जबाबदारी आणि सर्व धर्मांप्रती समभाव यांतून व्यक्त झाली. स्वराज्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे, तर मनाचे, विचारांचे आणि आचरणाचे स्वातंत्र्य होय. स्वराज्य टिकवण्यासाठी सुशिक्षित, नैतिक आणि कर्तव्यदक्ष नागरिक घडवणे हे महाराजांचे स्वप्न होते.
आज शिवजयंती साजरी करताना फक्त घोषणा, मिरवणुका किंवा प्रतीकात्मक कार्यक्रम पुरेसे नाहीत. शिवरायांचे विचार आपल्या जीवनात उतरवणे, समाजासाठी काहीतरी देणे, अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे—हीच शिवजयंतीची खरी भावना आहे.
शिक्षणाने माणसाचे आयुष्य बदलते, समाज घडतो पण आज आपल्या देशात अनेक मुले आहेत जे आयुष्यात परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. नारायण चिल्ड्रेन अकॅडमीने आजपर्यंत अश्या शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या हजारो मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले आहे आणि ते सुद्धा निशुल्क. शिक्षणाने त्यांचे उद्याचे भविष्य बदलेलच पण उद्याचा समृद्ध असा समाज हि घडेल. आमच्या ह्या सेवा कार्यात आपली एक छोटी मदत सुद्धा भरपूर फायदेशीर ठरू शकेल कदाचित आपल्या मदतीने एक लहान मुलगा वर्षभराचे शिक्षण पूर्ण करू शकेल.
प्रश्न: शिवाजी महाराजांचा जन्म कधी व कुठे झाला?
उत्तर: शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
प्रश्न: शिवाजी महाराजांचे आई-वडील कोण होते?
उत्तर: शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले होते आणि आई जिजाबाई भोसले होत्या. जिजाऊंनीच त्यांच्या मनात लहानपणापासून स्वराज्य, धर्म, न्याय आणि स्वाभिमानाचे संस्कार रुजवले.
प्रश्न: शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?
उत्तर: ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला.
प्रश्न: शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती?
उत्तर: रायगड किल्ला ही स्वराज्याची राजधानी होती.
प्रश्न: शिवाजी महाराजांनी प्रशासनात कोणती भाषा वापरली?
उत्तर: त्यांनी प्रशासनात मराठी व संस्कृत या भाषा वापरल्या.
प्रश्न: शिवाजी महाराजांची प्रसिद्ध युद्धनीती कोणती होती?
उत्तर: गनिमी कावा ही त्यांची प्रमुख आणि अत्यंत प्रभावी युद्धनीती होती.
प्रश्न: शिवाजी महाराजांवर लिहिलेले लोकप्रिय ग्रंथ कोणते आहेत?
उत्तर: मराठीतील ‘राजा शिवछत्रपती’ (बाबासाहेब पुरंदरे) आणि इंग्रजीतील ‘Shivaji and His Times’ (जदुनाथ सरकार) हे ग्रंथ अत्यंत लोकप्रिय आहेत.
प्रश्न: स्वराज्याबाबतीत शिवाजी महाराजांनी मांडलेला विचार काय होता?
उत्तर: स्वराज्य म्हणजे ‘स्वतःचे राज्य’ नव्हे, तर ‘रयतेचे राज्य’ हा विचार त्यांनी मांडला. राजा हा प्रजेचा सेवक असतो, हा आदर्श त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवला.
प्रश्न: शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला?
उत्तर: ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर त्यांचे निधन झाले.