महाराष्ट्रामधील विशेषकरून मराठी संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा आणि साडेतीन मुहूर्तां पैकी एक असलेला सण म्हणजे गुढीपाडवा. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी नवीन वर्ष सुरू होते. त्यामुळे गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवसापासून ‘शालिवाहन शके १९४८’ चा प्रारंभ होतो. वसंत ऋतूच्या आगमनासोबत साजरा होणारा हा सण नवचैतन्य, समृद्धी, विजय तसेच नवसंकल्पाचे प्रतीक आहे. गुढीपाडवा अर्थात नवीन वर्ष देशातील अनेक राज्यात तसेच समाजात वेगवेगेळ्या नावाने साजरे केलं जाते. जसे कर्नाटक आंध्रप्रदेश, तेलंगणा मध्ये ‘उगाडी’, काश्मिरी पंडित ह्याला ‘नवरेह’ तर सिंधी समाज ‘चेट्टी चांद ‘ म्हणून साजरा करतात. गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा, समृद्धीचा आणि शुभकार्यांचा दिवस असल्यामुळे या दिवशी लोक नवीन घर, कार, दागिने किंवा व्यवसायाची सुरुवात करणे शुभ मानतात.
गुढी म्हणजे ‘ब्रह्मध्वज’ किंवा विजय, आनंद आणि मंगलाचे प्रतीक असलेला ध्वज. तर पाडवा हा शब्द संस्कृतमधील ‘प्रतिपदा’ या शब्दावरून आला असून त्याचा अर्थ हिंदू महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिला दिवस असा होतो.यामुळे गुढीपाडवा हा दिवस नववर्षाची सुरुवात आणि विजयाचे प्रतीक मानला जातो.आणि सर्वत्र मोठ्या उत्साहात घराबाहेर गुढी उभारून साजरा केला जातो.
हिंदू पंचांगानुसार, गुढीपाडव्याची सुरुवात गुरुवार, १९ मार्च रोजी सकाळी ६.५२ वाजता होणार आहे आणि शुक्रवार, २० मार्च रोजी पहाटे ४.५२ वाजता तो संपेल. गुढी उभारण्यासाठी सकाळी ६.४० ते १०.४५ हा शुभमुहूर्त आहे.
या सणाशी अनेक कथा जोडलेल्या आहेत:
१. सृष्टीची निर्मिती: ब्रह्मपुराणानुसार, याच दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी विश्वाची पुनर्निर्मिती केली आणि काळाचे चक्र (सत्ययुग) पुन्हा सुरू झाले. म्हणून या दिवशी ब्रह्मदेवाचे पूजन केले जाते.
२. प्रभू श्रीरामांचे आगमन: चौदा वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा वध करून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले, तेव्हा प्रजेने आनंदाने विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या होत्या.
साफसफाई आणि सजावट: नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराची स्वच्छता केली जाते. स्त्रिया दारासमोर सुंदर रांगोळी काढतात आणि दरवाजाला आंब्याच्या पानांचे व झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात.
अभ्यंगस्नान: पाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून सुगंधी उटणे लावून स्नान (अभ्यंगस्नान) करण्याची परंपरा आहे.
गुढी उभारणे: घराच्या दर्शनी भागात बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र (साडी), कडुलिंबाची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी आणि वर तांब्या किंवा चांदीचा कलश लावून गुढी उभारली जाते.
कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा: गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच उन्हाळ्याच्या आरंभी येतो. या काळात वातावरणातील तापमान वाढते, त्यामुळे शरीरात पित्त वाढण्याची शक्यता असते.या दिवशी सकाळी कडुलिंबाची पाने, गूळ, जिरे आणि ओवा यांचे मिश्रण खाल्ले जाते. कडुलिंब (निंब) हे कडू असल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि गूळ शरीराला ऊर्जा देतो आणि पित्त संतुलित ठेवतो. हे आरोग्यासाठी अत्यंत हितकारक मानले जाते. त्याचबरोबर कडुलिंबाची कडू चव आणि गुळाचा गोडवा हे जीवनातील दुःख आणि सुख यांचे प्रतीक मानले जाते आणि नवीन वर्षात सुखदुःख दोन्ही स्वीकारायची तयारी ठेवूया हा संदेश देते
पारंपारिक पेहराव: पुरुष सहसा कुर्ता-पायजमा किंवा धोतर नेसतात, तर स्त्रिया नऊवारी किंवा काठपदराची साडी नेसून पारंपारिक दागिने परिधान करतात.
पारंपरिक पदार्थ: या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड-पुरी, बासुंदी, यांसारखे पारंपरिक पदार्थ तयार केले जातात आणि कुटुंबासह सणाचा आनंद साजरा केला जातो.
गुढी पाडवा हा सण आपल्याला नव्या आशा, नव्या संकल्प आणि सकारात्मकतेने जीवनाची सुरुवात करण्याचा संदेश देतो. मागील वर्षातील अनुभवातून शिकत नव्या उत्साहाने पुढे जाण्याची प्रेरणा हा सण देतो. म्हणूनच गुढी पाडवा हा केवळ नववर्षाचा सण नसून विजय, आशा, समृद्धी आणि संस्कृतीचा उत्सव आहे.
नारायण सेवा संस्थान गेली चार दशके निःस्वार्थ भावनेने अन्नदानाची सेवा करत आहे. संस्थेने जवळजवळ ४ करोड गरजूंपर्यंत अन्नसेवेचा लाभ पोहोचवला आहे. ह्यामध्ये उपचारासाठी आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ह्या सर्वांना निशुल्क अन्नदान केले आहे. हिंदू नववर्षांच्या सुरुवातीला आपण सुद्धा ह्या अन्नदानाच्या उपक्रमात आपले छोटे योगदान देऊ शकता. आपल्या मदतीमुळे एका रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकाला दिवसभराचे अन्न मिळू शकते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: गुढी पाडव्याचे धार्मिक महत्त्व काय?
उत्तर: गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी नवीन घर, कार, दागिने खरेदी किंवा व्यवसायाची सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते.
प्रश्न: २०२६ मध्ये गुढीपाडवा कधी आहे आणि मुहूर्त काय?
उत्तर: २०२६ मध्ये गुढीपाडवा १९ मार्च रोजी साजरा केला जाईल. गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त सकाळी ६:५२ पासून २० मार्चच्या पहाटे ४:५२ पर्यंत आहे.
प्रश्न: गुढी उभारण्याचा मुहूर्त काय आणि कधी उतरवावी?
उत्तर: गुढी उभारण्यासाठी सकाळी ६:४० ते १०:४५ हा शुभ मुहूर्त आहे. सूर्यास्ताच्या वेळी गुढीला नैवेद्य दाखवून पूजन करून सन्मानाने ती उतरवली जाते.
प्रश्न: गुढी कशी उभारली जाते?
उत्तर: बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र (साडी), कडुलिंबाची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी आणि वर तांब्या किंवा चांदीचा कलश लावून गुढी उभारली जाते.
प्रश्न: गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गूळ का खाल्ले जाते?
उत्तर: गुढीपाडवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला येतो, त्यामुळे शरीरात पित्त वाढण्याची शक्यता असते. कडुलिंब रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि गूळ शरीराला ऊर्जा देतो तसेच पित्त संतुलित ठेवतो. कडुलिंबाची कडू चव आणि गुळाचा गोडवा हे जीवनातील दुःख आणि सुख यांचे प्रतीक मानले जाते, जे नवीन वर्षात दोन्ही स्वीकारण्याचा संदेश देतात.