राम नवमीचा पवित्र सण मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांना समर्पित आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी नऊ दिवस चालणाऱ्या चैत्र नवरात्रीचा समारोपही होतो.
भगवान विष्णूंचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांचा जन्म अयोध्या नगरीत नवमी तिथीला पुनर्वसू नक्षत्र आणि कर्क लग्नात झाला होता, असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो.
या दिवशी भक्त मोठ्या उत्साहात भगवान श्रीरामांची पूजा करतात. मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, रामायण पठण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
वैदिक पंचांगानुसार भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी दुपारच्या (मध्याह्न) काळात झाला होता. त्यामुळे रामनवमीचे व्रत आणि उत्सव तोच दिवस धरून साजरा केला जातो, ज्या दिवशी नवमी तिथी मध्याह्न काळात विद्यमान असते.
यावर्षी नवमी तिथी २६ मार्च २०२६, गुरुवार रोजी सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी सुरू होऊन २७ मार्च २०२६, शुक्रवार रोजी सकाळी १० वाजून ०८ मिनिटांपर्यंत राहणार आहे. त्यामुळे २७ मार्च रोजी नवमी तिथी मध्याह्न काळाला स्पर्श करत नाही.
म्हणूनच यंदा राम नवमी २६ मार्च २०२६ रोजीच साजरी केली जाणार आहे.
भगवान श्रीरामांचा जन्म दुपारच्या वेळी झाला असल्याचे मानले जाते. त्यामुळे राम नवमीच्या दिवशी पूजा करण्यासाठी शास्त्रानुसार दुपारचा (मध्याह्न) काळ सर्वात शुभ मानला जातो.
म्हणून यंदा पूजेचा शुभ मुहूर्त मध्याह्न काळात सकाळी ११ वाजून २१ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ४६ मिनिटांपर्यंत ह्या दरम्यान आहे.
पौराणिक कथेनुसार अयोध्येचे राजा दशरथ अत्यंत पराक्रमी आणि धर्मनिष्ठ होते, परंतु त्यांना संतती नव्हती. त्यामुळे ते खूप चिंतेत असत. राजगुरूंच्या सल्ल्याने त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी राजाला दिव्य खीर खाण्यासाठी दिली. राजाने ती खीर आपल्या तीन राण्यांना म्हणजे कौशाल्या, कैकयी आणि सुमित्रा यांच्यात वाटली. यानंतर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला राणी कौसल्या यांच्या पोटी भगवान राम यांचा जन्म झाला. त्याच वेळी कैकयीच्या पोटी भरत आणि सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला.
भगवान श्रीराम हे श्री हरी विष्णू यांचे सातवे अवतार मानले जातात. त्यांनी पृथ्वीवर अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली. त्यांच्या जीवनातून सत्य, कर्तव्य, आदर्श आचरण आणि मर्यादा यांचे महत्त्व शिकायला मिळते.
राम नवमीच्या पावन प्रसंगी भगवान श्रीरामांची कृपा मिळावी यासाठी भक्तांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. त्यानंतर स्नान करून शुचिर्भूत व्हावे व पूर्ण श्रद्धा-भावनेने पूजेची तयारी करावी.
स्नान केल्यानंतर सर्वप्रथम सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करावे, कारण भगवान श्रीरामांचा जन्म सूर्यवंशात झाला होता. सूर्योपासना केल्यानंतर भगवान श्रीरामांची पूजा, व्रत आणि जप करण्याचा संकल्प करावा.
जर घरी पूजा करत असाल तर ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात (उत्तर-पूर्व दिशेला) एक चौरंग ठेवून त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे आणि त्यावर भगवान श्रीरामांची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी. त्यानंतर गंगाजलाने भगवंतांना अभिषेक करावा आणि चंदन, फुले, धूप, दीप, फळे, मिठाई व वस्त्र अर्पण करून विधीपूर्वक पूजा करावी.
पूजेच्या वेळी राम मंत्राचा अर्थात श्री राम जय राम जय जय राम” ह्या मंत्राचा जप करावा, रामरक्षा स्तोत्राचे पठण किंवा रामचरितमानस यांचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते. शेवटी भगवान श्रीरामांची आरती करावी आणि अर्पण केलेला प्रसाद सर्व भक्तांमध्ये वाटावा.
राम नवमी हा केवळ भगवान श्रीराम यांच्या जन्माचा उत्सव नसून धर्म, सत्य, कर्तव्य आणि आदर्श जीवनमूल्यांची आठवण करून देणारा पवित्र सण आहे. श्रीरामांच्या जीवनातून आपल्याला संयम, कर्तव्यनिष्ठा, आदर आणि न्याय यांचे महत्त्व शिकायला मिळते.
या दिवशी भक्तिभावाने पूजा, जप, दान आणि रामनामाचे स्मरण केल्याने मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे राम नवमीचा सण आपल्याला केवळ धार्मिक भावनेशी जोडत नाही, तर श्रीरामांच्या आदर्शांनुसार जीवन जगण्याची प्रेरणाही देतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: राम नवमी का साजरी केली जाते?
उत्तर: राम नवमी हा सण भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त साजरा केला जातो. भगवान श्रीराम हे धर्म, सत्य आणि मर्यादेचे प्रतीक मानले जातात.
प्रश्न: राम नवमी कोणत्या दिवशी साजरी केली जाते? ह्यावर्षी ती कोणत्या तारखेला आहे?
उत्तर: हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला राम नवमी साजरी केली जाते. २०२६ मध्ये राम नवमी २६ मार्च रोजी साजरी केली जाईल.
प्रश्न: राम नवमीचे धार्मिक महत्त्व काय आहे?
उत्तर: या दिवशी भगवान श्रीरामांची पूजा, जप आणि नामस्मरण केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि घरात सुख, शांती व समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
प्रश्न: राम नवमीला कशाप्रकारे पूजा केली जाते?
उत्तर: या दिवशी श्रीरामांची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करून फुले, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करून पूजा केली जाते. तसेच रामरक्षा स्तोत्र, रामायण पठण आणि भजन-कीर्तन केले जाते.
प्रश्न: राम नवमीला कोणते मंत्र जपावे?
उत्तर: “श्री राम जय राम जय जय राम” हा मंत्र जपणे अत्यंत शुभ मानले जाते.
प्रश्न: राम नवमीच्या दिवशी कोणते धार्मिक ग्रंथ वाचावेत?
उत्तर: या दिवशी रामायण, रामचरितमानस किंवा रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.