चैत्र नवरात्र हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव मानला जातो. हि नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते आणि रामनवमीपर्यंत चालते. या काळात देवी शक्तीची उपासना केल्याने शक्ती, धैर्य आणि सकारात्मकता मिळते असे मानले जाते. हिंदू धर्मातील या अत्यंत पवित्र सणाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीचे घरात आवाहन केले जाते. नंतर पुढील नऊ दिवस माता दुर्गेच्या विविध रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते. या नऊ दिवसांत अनुक्रमे माता शैलपुत्री, माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघंटा, माता कूष्मांडा, माता स्कंदमाता, माता कात्यायनी, माता कालरात्रि, माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री या देवीच्या रूपांची भक्तिभावाने आराधना केली जाते. या नऊ दिवसांत उपवास, जप, पूजा आणि साधना केल्याने पापांचा नाश होऊन सुख-समृद्धी मिळते, अशी श्रद्धा आहे. हा उत्सव नवचैतन्य, भक्ती आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानला जातो.
चैत्र नवरात्र सुरुवात गुरुवार, १९ मार्च २०२६, (प्रतिपदा तिथी सुरू होण्याची वेळ: सकाळी ६:५२ वाजता) होईल तर महाअष्टमी, गुरुवार, २६ मार्च २०२६ आणि नवरात्र समाप्ती राम नवमीला म्हणजे २७ मार्च २०२६ ला होईल.
कलश स्थापनेचा मुख्य शुभ मुहूर्त: पहिला मुहूर्त सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांपासून ते सकाळी ७ वाजून ५६ मिनिटांपर्यंत राहणार आहे.
दुसरा मुहूर्त दुपारच्या सुमारास, दुपारी १२ वाजून ०५ मिनिटांपासून ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत ज्याला अभिजीत मुहूर्त असे संबोधले जाते जो कलश स्थापना किंवा घटस्थापनेसाठी शुभ मानला जातो.
देवी दुर्गा आणि महिषासुराचा वध: पुराणांनुसार, महिषासुर नावाचा अत्यंत शक्तिशाली राक्षस होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवांकडून असा वर मिळवला की त्याला कोणताही देव किंवा मनुष्य मारू शकणार नाही. त्या वरदानामुळे तो अहंकारी झाला आणि देव, ऋषी आणि पृथ्वीवरील लोकांना त्रास देऊ लागला. देवता संकटात सापडल्यावर त्यांनी एकत्र येऊन आपली शक्ती एकवटली आणि त्या तेजातून देवी दुर्गेचा जन्म झाला. देवीने नऊ दिवस आणि नऊ रात्री महिषासुराशी युद्ध केले आणि शेवटी दहाव्या दिवशी त्याचा वध केला. ह्यामुळे देवीला महिषासुरमर्दिनी असे हि बोलले जाते. देवीने जे नऊ दिवस युद्ध केले ते नवरात्र म्हणून साजरे केले जाते आणि ते देवीच्या विजयाचे प्रतीक मानले जाते.
चैत्र नवरात्राचा संबंध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी आणि मराठा परंपरेशीही जोडलेला दिसून येतो. शिवाजी महाराज हे आई तुळजा भवानीचे परमभक्त होते. अनेक महत्वाच्या मोहिमांच्या अगोदर ते तुळजाभवानीचा आशीर्वाद घेत असत. स्वराज्य स्थापनेचा संकल्प महाराजांनी आई तुळजा भवानी देवीच्या मंदिरात केला होता अशी लोकमान्यता आहे. म्हणूनच नवरात्राच्या काळात किल्ल्यांवर आणि मंदिरांमध्ये देवीची विशेष पूजा केली जात असे. मराठा सैन्यातही या काळात देवीची आराधना करून विजयासाठी भक्तिभावाने प्रार्थना केली जात असे. त्यामुळे नवरात्र हा सण केवळ धार्मिक नसून शौर्य, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाची प्रेरणा देणारा सण हि मानला जातो.
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते॥
भागवत पुराण आणि मार्कंडेय पुराण यांमध्ये नवरात्रातील अष्टमी आणि नवमी तिथी अत्यंत फलदायी मानल्या गेल्या आहेत. या दिवशी देवीची भक्तिभावाने उपासना केल्यास सर्व संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. तसेच या दिवशी केलेल्या पूजेमुळे नवरात्रातील नऊ दिवसांची साधना आणि आराधना पूर्णत्वास जाते. या दोन्ही दिवशी भक्तगण देवी शक्तीची पूजा, होम-हवन, कन्या पूजन आणि विशेष धार्मिक विधी करून देवीचा आशीर्वाद घेतात.
अष्टमी ह्या दिवशी २६ मार्च ला असून त्याचे शुभ मुहूर्त खालीलप्रमाणे
मुहूर्त: सकाळी ६:२० ते ७:५२
दुसरा मुहूर्त: सकाळी १०:५६ ते दुपारी २:०१
संध्याकाळचा मुहूर्त: संध्याकाळी ५:०६ ते रात्री ९:३३
नवमी ह्या दिवशी २७ मार्च रोजी असून त्याचा मुहूर्त: सकाळी ६:१८ ते १०:५६ ह्या काळात आहे
कन्यापूजन
हिंदू शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे “कुमार्यः पूजिता यत्र तत्र देवी प्रसिद्यति.” अर्थात ज्या ठिकाणी कुमारिका (कन्या) यांचा सन्मानपूर्वक पूजन केले जाते, त्या ठिकाणी देवी प्रसन्न होते आणि आपला कूर्पाशीर्वाद ठेवते. चैत्र नवरात्रात अष्टमी आणि नवमी हे दोन्ही दिवस कन्या पूजनासाठी अत्यंत शुभ मानले जातात.
आपल्या हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार प्रत्येक कन्येमध्ये (कुमारिकेमध्ये) आदिशक्तीचा अंश असल्याचे हि मानले जाते. त्यामुळे कन्यांची पूजा करणे म्हणजेच देवी दुर्गेची पूजा केल्यासारखी असते अशी मान्यता आहे
अष्टमी आणि नवमी ह्या दोन्ही दिवसांत घरात लहान मुलींना आमंत्रित करून त्यांचे पाय धुतले जातात, त्यांना ओवाळले जाते आणि प्रसाद म्हणून मिष्टान्न किंवा इतर नैवेद्य दिला जातो. त्यानंतर त्यांना वस्त्र, फळे किंवा छोटीशी भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.
चैत्र नवरात्र हा भारतीय संस्कृतीतील श्रद्धा आणि भक्तीचा अद्भुत संगम आहे. नऊ दिवस देवीची भक्तिभावाने पूजा करून भक्त आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची कामना करतात. चैत्र नवरात्र हा केवळ धार्मिक सण नाही, तर तो आत्मशुद्धी, सकारात्मकता आणि नव्या सुरुवातीचा संदेश देणारा उत्सव आहे. नऊ दिवसांची उपासना माणसाला संयम, श्रद्धा आणि आत्मविश्वास शिकवते.
देवी दुर्गेची कथा आपल्याला सांगते की अहंकार आणि अन्याय कितीही बलवान असला तरी शेवटी सत्य आणि धर्माचाच विजय होतो. म्हणूनच नवरात्र हा सण समाजात धैर्य, आशा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा मानला जातो. त्याचबरोबर ह्या नवरात्रात केले जाणारे कन्या पूजन ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती नारी शक्तीचा सन्मान करण्याची सुंदर परंपरा आहे. समाजात मुलगी ही देवीचे रूप आहे, तिचा आदर आणि सन्मान केला पाहिजे, हा संदेश या परंपरेतून दिला जातो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: चैत्र नवरात्र कधी असते?
उत्तर: चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून चैत्र नवरात्र सुरू होते आणि रामनवमीपर्यंत ९ दिवस चालते. २०२६ मध्ये चैत्र नवरात्री १९ मार्च ते २७ मार्च दरम्यान साजरी होईल.
प्रश्न: चैत्र नवरात्रीचे धार्मिक महत्त्व काय?
उत्तर: हिंदू धर्मातील हा अत्यंत पवित्र सण असून पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीचे घरात आवाहन केले जाते. पुढील नऊ दिवस माता दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या काळात उपवास, जप, पूजा आणि साधना केल्याने पापांचा नाश होऊन सुख-समृद्धी मिळते, अशी श्रद्धा आहे.
प्रश्न: घटस्थापनेसाठी उत्तम मुहूर्त कोणते?
उत्तर: घटस्थापनेसाठी दोन शुभ मुहूर्त मानले जातात—पहिला सकाळी ६:५३ ते ७:५६ आणि दुसरा दुपारी १२:०५ ते १२:५३ दरम्यान.
प्रश्न: नऊ दिवस माता दुर्गेच्या कोणत्या ९ रूपांची पूजा केली जाते?
उत्तर: माता शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी आणि सिद्धिदात्री या देवीच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते.
प्रश्न: छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या देवीचे परमभक्त होते?
उत्तर: छत्रपती शिवाजी महाराज हे आई तुळजा भवानी देवीचे परमभक्त होते.
प्रश्न: घटस्थापना पूजेच्या वेळी कोणते मंत्र महत्त्वाचे मानले जातात?
उत्तर: घटस्थापनेच्या वेळी दुर्गा सप्तशतीचे पठण महत्त्वाचे मानले जाते. तसेच खालील मंत्र भक्तिभावाने जपले जातात—
“या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”
“सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते॥”
प्रश्न: चैत्र नवरात्रीत अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन का करतात?
उत्तर: हिंदू धर्मात प्रत्येक कन्येमध्ये आदिशक्तीचा अंश असल्याचे मानले जाते. त्यामुळे कन्यांची पूजा करणे म्हणजे देवी दुर्गेची पूजा केल्यासारखे मानले जाते. अष्टमी किंवा नवमीला केले जाणारे कन्यापूजन अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते.